औरंगाबाद: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचा उत्साह आज शहरामध्ये पाहायला मिळाला. यानिमित्त अनेक शिवप्रेमी नागरिकांनी क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अनेक शिवप्रेमी नागरिक क्रांती चौकात दाखल होत, जय जिजाऊ जय शिवरायचा जयघोष करत छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, छावा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, योगेश केवारे, परमेश्वर नलावडे, संभाजी ब्रिगेडचे राहुल बनसोड पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी क्रांती चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
शिवाजी राजे मित्रमंडळाच्या पुढाकाराने क्रांती चौक परिसरात आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान केले. शिवाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळी पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान आणि व्यसनमुक्ती अभियानही राबविण्यात आले. दुपारच्या सत्रात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी शहरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रवाना झाले आहेत.